आजचा युवक आणि व्यसनाधीनता

 आजचा युवक आणि व्यसनाधीनता

श्री.गुरुराजकुमार इनामदार, सहा.प्राध्यापक  

gkinamdar@coe.sveri.ac.in

स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पंढरपूर.

                'युवक' म्हटल्याबरोबर नजरेसमोर चित्र उभे राहते ते म्हणजे भारदस्त व्यक्तिमत्व, उंच, धिप्पाड, कणखर बाण्याचा, सळसळत्या रक्ताचा आणि स्वकर्तृत्वाने, अभिमानाने, स्वाभिमानाने समाजामध्ये ताठ मानेने वावरणारा तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्वाचा किशोरवयीन नवशिका व्यक्ती. देशाच्या विकासाला आपल्या कर्तुत्वाने अलौकिक बनवणाऱ्या अशा अद्वितीय व्यक्तीला 'युवक' म्हणत असताना सर्वांच्याच ह्रदयातून एक प्रकारचा विश्वास आणि आदर व्यक्त होत असतो. हाच युवक हा देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक परिस्थितीचा मुख्य स्तंभ असतो.परंतु एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना अपेक्षेप्रमाणे युवकांचा सकारात्मक दृष्टिकोन पहावयास मिळत नाही. अनेक युवक विविध मार्गाने आपले आयुष्य जगत असताना काहीतरी वेगळे कार्य करून आपले व आपल्या देशाचे नाव जगाच्या पाठीवर आदराने प्रस्थापित करत असतात आणि त्याचमुळे कोणत्याही प्रगतीचा महामेरू म्हणून युवकच समोर येत असतो. जगाबरोबर स्पर्धा करत असताना विविध नीतिमूल्यांचा आधार घेत कार्यरत राहिल्यामुळेच तर युवक नेहमी नावारूपाला येत असतात. यातीलच काही युवक ताणतणाव, वाईट संगत आणि इतर काही कारणांमुळे आपल्या ध्येयापासून दूर जातात आणि  नकळत व्यसनाच्या आहारी जातात. हा सर्व प्रवास घडत असताना त्याला मिळणारे मार्गदर्शन किंवा आधार देखील तितकाच कारणीभूत असावा
            
आजची परिस्थिती पाहिली तर जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून भारत देशाची ओळखही सर्वश्रुत आहे. परंतु आपल्या देशातील अनेक तरुण हे व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे खूप मोठे संकट निर्माण झाले आहे. विभिन्न प्रकारच्या व्यसनामुळे आजचा युवक क्षणिक बनला असून तात्पुरत्या आभासी दुनियेत वावरत आहे. त्याला या संकटामधून बाहेर काढणे हे खूप महत्त्वाचे आणि जिकिरीचे काम आहे. त्याच्या मानसिकतेमध्ये,  विचारांमध्ये आणि आचरणामध्ये अलौकिक बदल घडवण्यासाठी सर्वांनी समोर येणे गरजेचे आहे. व्यसनामुळे आयुष्यामधील मोलाचा आणि कधीही परत न येणारा वेळकाळ व मिळालेला जन्मदेखील योग्य रीत्या व्यतीत करावा हे त्याला समजणे व समजवणे गरजेचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर  व्यसनाधीनतेमुळे कितीतरी प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होत असते आणि ती पूर्णतः निष्फळ किंवा अर्थव्यवस्थेचा अपव्यय म्हणण्यास  हरकत नाही. एखादा व्यक्ती स्वतःच्या व्यसनावर जेवढा खर्च करतो तेवढा खर्च तो स्वतःच्या मुलामुलींच्या शिक्षणावर करत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हेच आपल्या देशातील युवकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. हे भयानक वास्तव बदलणे अत्यंत गरजेचे आहे.  
             
व्यसनासारख्या गंभीर विषयांवर बोलत असताना आजचा युवक हा व्यसनाधीन होण्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर योग्य ते उपाय शोधणे गरजेचे आहे. तरच उद्याचा उज्वल भारत आपण निर्माण करू शकेल. व्यसनाधीनतेपासून दूर जाण्यासाठी युवकांना प्रेरित करण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत, त्याचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. सांप्रदायिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि वैयक्तिक मूल्यांच्या आधारे व्यसनाधीन ते पासून दूर जाता येते हे मात्र त्रिकालबाधित सत्य असून ते आचरणामध्ये आणल्यानंतर नक्कीच एक आदर्श युवक घडला जाईल
             
असो असाच युवक आपल्या देशामध्ये घडावा आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजयांच्या स्वप्नातील उज्वल महाराष्ट्र आणि आदर्श भारत देश बनावा हीच परब्रम्ह पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना!

 

Comments